Wednesday, 11 April 2012

आशा निराशा



  • बहुतेक जण आशावादी असतात; पण काहींना सतत निराशेने वेढलेले असते. मनानेच निर्माण केलेल्या आशा आणि निराशा या दोन अवस्थांकडे तटस्थपणे आणि पुरेशा समजूतदारपणे पाहायला शिकले पाहिजे. आशा मनाला उभारी देते; तर निराशा त्याला खोल गर्तेत लोटते. आशा कृतीला प्रवृत्त करते; तर निराशा निष्क्रिय बनवते. आशा म्हणजे उद्दिष्टाकडे केलेला सकारात्मक प्रवास आणि निराशा म्हणजे शून्यात घेतलेली उडी. आशा-निराशेचा खेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात सुरू असतो. आशेबरोबर ऊर्जा असते; म्हणूनच तिच्यात चैतन्य असते. निराशा म्हणजे ऊर्जाहीनता, आळस. तेथे तमाचे राज्य असते. अपेक्षित घडले नाही, की निराशा तिचे जाळे फेकते आणि आपण त्यात अडकतो. या "अनपेक्षिता'ची शक्‍याशक्‍यता, तारतम्य लक्षात घेणे, म्हणजेच निराशेपासून दूर राहणे.
    - आशा जरूर हवी; कारण ती प्रगतीची वाट असते. एक महत्त्वाचे ः ती पोकळ असता कामा नये. पोकळ आशा छोट्या-छोट्या आंदोलनांनी वाऱ्यावर उडून जाते. आशा पक्की, समजुतीने निश्‍चित केलेली असेल, तर कोणत्याही बाह्य कारणांचा परिणाम तिच्यावर होत नाही.
    - अंधार आणि निराशा यांचे नाते जवळचे आहे. निराशेने वेढलेली माणसे प्रकाश टाळतात, ती एकलकोंडी होतात, ती यामुळेच. निराश माणूस त्या निराशेलाच एवढा कवटाळून बसतो, त्याच विचारांत राहतो, की त्या गुंत्यातून सुटका करून घेणे त्याला जवळजवळ अशक्‍य वाटू लागते.
    - प्रयत्नांचे सातत्य हा आशेकडे केलेला योग्य प्रवास असतो. प्रयत्नांशिवाय आशा पूर्ण होण्याचे स्वप्न म्हणजे हवेतील मनोरा. प्रयत्न, पुन्हा प्रयत्न, न थकता प्रयत्न ही आशेकडे जाण्याच्या प्रवासाची खरी किंमत असते. ती प्रत्येकाला चुकती करावीच लागते.
    - आशा-निराशा या भावनांकडे अलिप्तपणे पाहता यायला हवे. ती आंदोलने येत-जात राहणारच. तुफान येईल, म्हणून बोटी-होड्या हाकारणे कुणा थांबवते थोडेच? त्यासाठी संयम आणि निकोप दृष्टिकोन हवा.


1 comment:

  1. आशा सगळ्यांनाच असते गं... पण कधी कधी आशेच किरण नाहीच दिसत .. तो दिसत असला ना तरी खूप अंधुक असतो .. मग आतून कितीही खंबीर असला ना तरी माणसाला निराशा येतेच..

    ReplyDelete